मला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte

मला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte

by अपर्णा पाध्ये

aparna-padhye

केतकी ची आमची पहिली भेट ‘शाळा’ या तिच्या पहिल्या सिनेमाच्या लाँच पार्टी ला झाली , तेव्हापासुनच संदीपला तिचे खूप कौतुक वाटायचे. तिचा आणि सुवर्णा माटेगावकर (तिची आई) , यांचा एक ‘माय लेकींचा ‘ खास कार्यक्रम करायचे संदीपच्या खूप मनात होते. पण आमचे US ला स्थलांतरित होणे, मग इथे बस्तान मांडून ,सगळ्यांची ओळख होणे , यात बराच कालावधी निघून गेला . या वर्षी गणपती च्या कार्यक्र्माच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठरवण्याचा योग आला. कार्यक्रम कुठे ,कधी, कसा करायचा या सर्व गोष्टी संदीप आणि पराग माटेगावकर (केतकी चे बाबा ) ठरवू लागले. US मधल्या वेगवेगळ्या मंडळांना, मित्रांना संपर्क करून पूर्ण US दौरा ठरवण्यात आला , वेगवेगळ्या ठिकाणी १० कार्यक्रम ठरले सुद्धा! बघता बघता त्यांचा व्हिसा होऊन , तिकीट पण हातात आले आणि माझे प्लांनिंग चालू झाले . सगळ्यांची राहायची व्यवस्था , ५ दिवसाचे फिरण्याचे, खाण्यापिण्याचे प्लांनिंग चालू होते. त्यांचा हा पहिलाच US चा दौरा असल्याने जेट लॅग चा त्रास , खाण्या पिण्याचे पथ्य , आवडी निवडी , बाहेर फिरण्याची हौस , लोकांच्या सहवासाची आवड या सर्व गोष्टींचा विचार करत, ५ दिवसाचा आराखडा बांधला . मुलींच्या शाळा चालू होऊन एकच आठवडा झाला होता , त्यामुळे त्यांच्या शाळा सांभाळुन सगळे करायचे होते. आम्ही सर्व जण त्यांची आतुरतेने वाट बघत होतो.

बघता बघता ५ सप्टेंबर उजाडला केतकी माटेगावकर, सुवर्ण माटेगावकर,पराग माटेगावकर आणि विशाल गन्द्रत्वार घरी आले . माटेगावकरांची पहिलीच अमेरिका वारी असल्याने अमेरिकेच्या प्रशस्तपणाचे, स्वच्छतेचे आणि एकूणच इथल्या सर्वच गोष्टींचे त्यांना खूप कौतुक वाटत होते. आणि कुठल्याही गोष्टीचे कौतुक करावे तर ते सुवर्णाने ! इतके गोड , इतकं पॉझेटिव्ह आणि इतके मनापासून कौतुक करते कि समोरच्याला लगेच आपलेसे करून घेते ती ! तिची आणि माझी इतकी छान घट्ट मैत्री झाली या ५ दिवसाच्या सहवासात !! आणि केतकी बद्दल काय बोलावे ? जितकी छान, तितकीच समजूतदार!! मला मावशी व संदीप ला काका म्हणत तिने आम्हाला जे काही वेड लावलाय ते शब्दांच्या पलीकडले !

देवाने तिला भरभरून सौंदर्य , सुरेल गोड आवाज , प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि या सर्वांपेक्षा महत्वाचे निर्मळ मन दिलंय ! आणि मुख्य म्हणजे या सगळ्याला पराग आणि सुवर्णाने दिलेल्या भरभक्कम संस्काराची जोड आहे . एवढे लाखोंनी चाहते असणारी केतकी मात्र सगळ्या लहान मोठ्यांशी अगदी प्रेमाने बोलते आणि वागते. इतके साधं वागणे , इतकी गोड वाणी आणि इतके भुरळ पाडणारं सुहास्य वदन ! का तिला जगभर एवढे चाहते आहेत हे लक्षात येते !! ती वावरत असलेल्या ‘फिल्मी जगात ‘ स्वतःचे मत सांभाळत , स्वतःची संस्कृती जपत , पाय जमिनीवर घट्ट रोवून उभी आहे ती ! कुठे कशाचा गर्व नाही कि मीपणा नाही. तिच्या या स्वभावामुळे मुलींना सुद्धा ‘केतकी ताईचे’ वेड लागले. केतकी ची खूप स्वप्न आहेत आणि माझी खात्री आहे कि तिचे हे साधे पण, तिचे सूर , तिचा संगीताचा अभ्यास , तिचे अभिनयाचे वेड,तिची जिद्द, तिची कल्पकता , तिची लोकांत मिसळायची क्षमता तिला एका वेगळ्याच जागतिक पातळीवर घेऊन जाईल आणि इतकेच नाही तर हे सर्व करत असताना आपली भारतीय संस्कृती अतिशय समर्थ पणे ती परत सर्व जगाला दाखवेल.

विशाल ची आणि माझी ओळख तो इथे आल्यावरच झाली. त्याची आणि माझी चंद्रपूरची ओळख निघाल्याने आम्ही पहिल्यांदाच भेटतोय असे वाटलेच नाही. अतिशय साधा, आपले सर्वस्व तबल्या साठी अर्पण करून, सर्व काही सोडून, एका वेगळ्या वाटेवर प्रवास करणाऱ्या विशालचे मला खूप कौतुक वाटायचे.पंडित ह्रिदयनाथ मंगेशकरांसोबत तबला वाजवणारा विशाल आपल्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वाना आपलेसे करून गेला. अतिशय तन्मयतेने २/३ तास रोज तो तबल्याचा रियाज करायचा ! त्या आवाजाने आमचे घर अगदी दणकावुन जात होते . त्यात पराग चा कीबोर्ड , केतकी चा पियानो , सुवर्णाचे गाणे , आमचे घर अगदी संगीतमय झाले होते! खूप छान वाटत होते आम्हाला! प्रत्येक दिवस बाहेर फिरण्यात ,नवीन नवीन गोष्टी बघण्यात , लोकांना भेटण्यात आणि रात्री गप्पा टप्पा करण्यात कसा निघून जात होता, कळतच नव्हते.

पाहता पाहता कार्यक्रमाचा दिवस उजाडला. कार्यक्रमाची जितकी उत्सुकता होती तितकीच कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी हे सर्व जाणार याची हुरहूर होती ! कार्यक्रमाच्या दिवशी सगळे वेळेवर आटोपून ठरवल्याप्रमाणे वेळेत मंदिरात पोचलो, पोचल्यावर सर्व साऊंड चेक करून तयार झाले आणि बरोबर वेळेवर कार्यक्रम चालू झाला . कार्यक्रमासाठी विहार हॉल पूर्ण भरला होता , एवढा जास्त प्रेक्षक वर्ग आजपर्यंत कुठल्याच Charlotte मधल्या कार्यक्रमात मी पहिला नव्हता. सुरवातीला भजन, मग मराठी गाणे , हिंदी गाणे,नाट्यसंगीत , लावणी एकापेक्षा एक सुरेल गाण्यांची लड लागली. सुवर्णा आणि केतकी च्या गोड आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन बसले होते. वेळ फटाफट पुढे सरकत होता. मध्यंतर न घेता सुवर्णा आणि केतकी ची ओळख करून देणारी एक विडिओ क्लिप दाखवायचे ठरले होते. केतकीचा अगदी लहानपणापासूनचा संगीताचा प्रवास आणि मग तिचे अभिनय क्षेत्रातले पदार्पण,तिला मिळालेले विविध पारितोषिकं! अतिशय थोड्या वेळात पराग ने बनवलेली ती क्लिप केतकी बद्दल खूप काही सांगून गेली. टाइम पास मधला केतकी चा ‘चला हवा येऊ द्या’ चा संवाद सर्वांना खूप हसवून गेला.

लहान मोठ्यानं खिळवून ठेवणारा हा कार्यक्रम संपूच नये असे वाटते होते. एवढीशी केतकी जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे गाणे तितक्याच विविधतेने व सामर्थ्याने म्हणते तेव्हा खूप नवल वाटते. तिच्या ‘केतकी’ या अल्बम मधले पाऊस , तिचे नुकतेच आलेले संस्कृत गाणे आणि तिचे ‘वेड लागले प्रेमाचे’ एका मागे एक वन्स मोअर मिळत होते !! पण कुठेतरी थांबायला हवे होते , दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता निघायचे होते . सुवर्णाच्या ‘वंदे मातरम’ या गाण्याने कार्यक्रमाचा मस्त शेवट झाला. लोकांच्या प्रतिक्रिया , केतकी सोबत फोटो, यामध्ये पुढचा अर्धा पाऊण तास कसा निघून गेला कळलंच नाही. मग जेवण करून घरी आलो आणि लगेच झोपलो!
केतकी चा US मधला पहिला प्रयोग अतिशय जोरदार झाल्याचे समाधान होते.दुसऱ्या दिवशी पहाटे , केतकी आणि सर्वाना पुढील US दौऱ्यासाठी शुभेच्छा देऊन भरल्या मनाने एअरपोर्ट वर सोडून आलो.
असे गेले कित्येक दिवस चालू असलेला केतकी चा ‘मला वेड लागले प्रेमाचे’ हा कार्यक्रम माझ्या मनात कायमची एक गोड आठवण करून केला आणि म्हणूनच पहिल्यांदाच माझे मनोगत मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला ! आता खरं म्हणावेसं वाटतं , मला वेड लागले माटेगावकरांचे 🙂
https://youtu.be/GA47FywamMI

mategaokar